छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराज चा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूग